स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांचे कारण शिक्षणाचा अभाव हे आहे. विशिष्ट जातीपुरतं, धर्मापुरतं मर्यादित असलेलं शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित काळातील प्रस्थापित व्यवस्थेला झुगारून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी या देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मध्ययुगीन काळामध्ये स्त्रियांवर हजारो बंधने लादलेली होती. अन्याय-अत्याचार सहन करणारी, शिक्षण म्हणजे काय हे माहीत नसणारी व अत्याचारात समाधान मानणारी अशी स्त्रीची प्रतिमा या काळात बनलेली होती. समाजरचनेतील स्त्रियांचे स्थान पुरुषांच्या तुलनेत दुय्यम होते. स्त्री एक उपभोगाची वस्तू आहे असे मानले जात होते. कुटुंबातील पती,मुले, सासू-सासरे यांची सेवा करणे, एवढंच तिचं काम होतं. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये सन १८२०पर्यंत होती. त्यानंतर देशामध्ये ब्रिटिश, पोर्तुगीच, डच यांचे आक्रमण झाले. त्यांनी भारतात सत्ता स्थापन केली. आपली सत्ता बिनधोकपणे चालावी यासाठी त्यांना नोकरांची गरज होती. हे नोकर सुशिक्षित असावे यासाठी त्यांनी भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेचा पाया रोवला. पुढे ३जानेवारी १८३१ रोजी जन्माला आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी मात्र शिक्षणाच्या प्रसारासाठी , अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे , हे ओळखले. काही क्रूर रूढी परंपरेच्या विरोधात त्यांनी लढा दिला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या मृत्यूनंतर सती जाणे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई ही पद्धत होती. विधवा स्त्रियांना समाजात हीन वागणूक मिळत असे. या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार लैंगिक भुकेच्या शिकार बनत.पुढे या महिला गरोदर होत , गरोदर विधवा म्हणून समाजात त्यांचा छळ करण्यात येत . जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. यात सावित्रीबाईनी विधवांची बाळंतपणं केली. आजच्या काळात मात्र , मुलीला आईच्या पोटातच मारलं जातं व जन्मलेल्या मुलीला रेल्वे स्टेशनवर अथवा शिक्षणाचं मंदिर मानलं जाणाऱ्या विद्यापीठात बेवारस सोडलं जातं. सावित्रीबाईंनी अनाथ मुलांना आपली मुले माणून त्यांचे संगोपन केलं पण आम्ही कोणत्या इतिहासाची उभारणी करतोय कोणता विचार घेतोय हे अजून सुद्धा मला कळत नाही.
स्त्रियांनी शिकलं पाहिजे. जसा पुरुषांना जगण्याचा , राहण्याचा, विचारांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा हक्क आहे. त्याप्रमाणे स्त्रियांनाही सर्व हक्क मिळायला हवेत. यासाठी हजारो लोकांचा विरोध पत्करून, महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला साक्षर बनविले. देशात शैक्षणिक क्रांती व्हावी यासाठी१ मे इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. पण ही शाळा फार काळ चालू शकली नाही ती मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी “भिडेवाड्यात” जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा होती. हे दांपत्य शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करत होते. त्यांच्या कार्यामुळे सनातन्यांकडून, सावित्रीबाईंच्या नेहमीच अंगावर शेण-दगड फेकले जाई. घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागत. म्हणून सावित्रीबाई नेहमी सोबत दोन लुगडे ठेवत असत. इतका त्रास सहन करून देखील त्यांनी आपले शैक्षणिक क्रांतीचे कार्य सोडले नाही. पण आज सुद्धा देशातील ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागामध्ये शिक्षकांचा असलेला अपूर्ण प्रमाण यामुळेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरामध्ये जावे लागते . देशात सरकारी शाळांचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि दिवसेंदिवस खाजगी शाळांचे प्रमाण वाढत चाललंय . शिक्षणाची विद्यापीठं उभे करण्यापेक्षा देशात अंधश्रद्धेचे मंदिरं उभी करण्यात येतायेत. सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची स्मारक शहराशहरात बसवली जातात.पण पुणे येथे सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या. शाळेकडे मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते की काय असा ❓ सर्वसामान्यांच्या मनाला पडतो. सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या शाळेची उभारणी करायची सोडून, त्यांच्या नावाने नव्या शाळा उभारण्यात येताना आम्हाला बघायला मिळतात. आम्ही कोणत्या इतिहासाचं जतन करतोय हेच आम्हाला अजून कळले नाही.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. १८५४ साली सावित्रीबाईनी काव्यफुले नावाच्या कवितासंग्रहत अंधश्रद्धेवर कडकडून हल्ला चढवताना सावित्रीबाई लिहितात .
” नवस करिती ! बकरु मारीन
बाळ जन्मी ! धेंडे मुल देती
नवसा पावती ! लग्न का करती ! नर – नारी !! ”
दगडधोंडे जर मुले देत असतील तर स्त्री-पुरुषांना लग्न करण्याची
गरजच काय ? असा संदेश त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातील कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. विधवा महिलांचे केशवपन करून त्यांना विद्रुप केले जाई. त्यामुळे नारायण बंधु लोखंडे यांनी आपल्या दिनबंधु या वृत्तपत्रात २३ मार्च १८९०ला आवाहन करुन नाभिकांचा ऐतिहासिक संप घडवून आणला त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी लढा दिला. पण आज मात्र स्त्रिया स्त्रियांच्या विरुद्ध काम करताना दिसतात.भारतामध्ये केरळ एक असं राज्य आहे. जिथे पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे. केरळ मध्येच महिलांचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण आहे. याच राज्यात शबरीमाला मंदिरात पूर्वी महिलांना प्रवेश नव्हता. माञ २०१८साली कोर्टाने दिलेल्या निकालानुसार शबरीमाला मंदिरात महिलांना , प्रवेश दिला असतानादेखील काही धार्मिक संघटनांनी त्याचा विरोध करत व त्या विरोधात समर्थन करतात केंद्रात मंत्री असलेल्या स्मृति इराणी या महिलेने दिलेली महिलांविरुद्ध प्रतिक्रिया. स्त्रियांसाठी खूपच अपमानास्पद आहे. स्त्रीच स्त्रियांच्या विरोधात काम करतांना आम्हाला दिसते.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांच्या निधनानंतर त्यावेळी सावित्रीबाईनी स्वत: हातात टिटवे घेऊन जोतीरावांच्या शवास अग्नी दिला. जोतिरावांच्या निधनानंतर सावित्रीबाईनी त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी इ.स. १८९३ ते ९७ पर्यंत कार्याची धुरा सांभाळली. इ.स. १८९३ मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षा म्हणून काम केले. सावित्रीबाईंचा आदर्श घेऊनच देशात राजकीय क्षेत्रात महिला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या .१९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.पण आज महिला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विविध पक्षाच्या ७८ महिला खासदार निवडून आल्या आहेत. पण इंदिरा गांधी च्या नंतर भारताला महिला पंतप्रधान मिळाले नाही. महाराष्ट्र राज्याला अजून सुद्धा महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य सरपंच महिला होताना बघायला मिळतात. पण अर्ध्या पेक्षा वर त्यांचा कारभार त्यांचे पती, भाऊ, वडील,चालवताना दिसतात. राजकीय क्षेत्रात महिलांना दिलेले आरक्षण हे फक्त कागदोपत्री न ठेवता वर्तमानात ते वास्तवात उतरवलं पाहिजे.
सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे त्यामुळेच प्लेगची साथ भयंकर आली असतानाही त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचा परवाना करता प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र शासनाने दिनांक ९ ऑगस्ट २०१४ रोजी पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नामकरण केले. पण पुणे येथील त्यांनी सुरू केलेल्या शाळांची मात्र नव्याने उभारणी केली नाही. शोकांतिका वाटते. जागतिक , पातळीवर विचार केला तर जगात महिला वेगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवताना दिसताय आहे. पण आमच्या देशात मात्र स्त्रियांवरील होणारे अन्याय-अत्याचार थांबताना दिसत नाही.
आम्हीसुद्धा जगाच्या बरोबरीने चालू शकलो तर नक्कीच आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जयंती साजरी केली असे म्हणता येईल.
आकाश बालाजी सावंत