Friday, April 19, 2024
HomeMarathiMuknayak Newspaper

Muknayak Newspaper

हजारो वर्षांच्या ‘ मूक ‘ परंपरेला छेद देणारा ‘ ‘ मूकनायक ‘ !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक समाजशास्त्री तसेच घटना तज्ञ म्हणून सर्वांनाच परिचयाचे आहेत, परंतु बाबासाहेब एक उत्कृष्ट पत्रकार होते. हे फार कमी लोक जाणतात. बाबासाहेबांनी वृत्तपतत्रासारख्या सबळ माध्यमाचा वापर अस्पृश्य समाजाला स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी केला.हजारो वर्षांपासून मानसिक व धार्मिक गुलामीत अडकलेल्या मुक्या लोकांचा आवाज बनण्याचे कार्य त्यांनी मूकनायक च्या माध्यमातून बखुबिने पार पाडले.
परंपरेच्या जोखडात अडकलेल्या आणि धार्मिक गुलामीच्या विळख्यात सापडलेल्या, अस्पृश्य जनास जागृत करण्यासाठी व त्यांनी गुलामीच्या बेड्या झिडकारून देऊन सन्मानाने जगावे म्हणून, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक वृत्तपत्राची स्थापना केली. 1919 साली ब्रिटिश शासनाद्वारे साऊथबरो कमिटीचे गठन करण्यात आले होते. या कमिटीस जातींचा कायदा बनवण्याच्या मसुद्यात भारतीयांना मदत करण्यासाठी भारतात ब्रिटिश शासनाकडून नियुक्‍त करण्‍यात आले होते. या कमिटीसमोर अस्पृश्य समाजाची कैफियत मांडण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्याप्रमाणे त्यांनी त्या कमिटीसमोर अस्पृश्य समाजाची कैफियत मांडली व स्वतंत्र जातीआधारित मतदारसंघांची मागणी केली. या मागणीस भास्करराव जाधव सोडता इतर कोनाही भारतीय नेत्याने पाठिंबा न दर्शविल्यामुळे हा प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. अस्पृश्यांची कैफियत केवळ त्यांचा प्रतिनिधीच अधिक आत्मीयतेने तसेच तळमळीने मांडू शकतो हे बाबासाहेबांच्या लक्षात आले. यातूनच त्यांना वृत्तपत्राची आवश्यकता जाणवू लागली . हजारो वर्षांपासून मुक्या असलेल्या मनांना जिवंत करण्यासाठी वृत्तपत्र हाच एकमेव मार्ग आहे हे बाबासाहेबांच्या ध्यानात आले. पुढे 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्राची स्थापना केली.
मूकनायक वृत्तपत्र चालविण्यासाठी बाबासाहेबांना आर्थिक मदतीची गरज भासू लागली. ही बाब छत्रपती शाहू महाराजांच्या ध्यानात येताच त्यांनी बाबासाहेबांना पंचवीस हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे बाबासाहेब अधिक जोमाने प्रबोधनाच्या कामाला लागले व बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय लेखनास चालना मिळाली.त्याकाळी स्वातंत्र्य चळवळीने जोर पकडला होता. सुधारणावादी चळवळही बरीच विस्तारली होती. त्याच काळी ब्राह्मण व ब्राह्मणेतर वाद अत्यंत चिघळला होता. या सर्व राजकीय उलथापालथीच्या कालावधीत अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांकडे व समस्यांकडे सर्वांचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच बाबासाहेबांनी मूकनायक वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला .
मूकनायकापूर्वी ब्राह्मणेतर चळवळीतील अनेक वृत्तपत्रांनी अस्पृश्य लोकांच्या समस्यांसंदर्भात लिखाण केले होते. परंतु ते फारच त्रोटक होते. यामुळेच अस्पृश्य चळवळीचे स्वतंत्र वृत्तपत्र असावे असे बाबासाहेबांना नेहमी वाटत असे. याचीच परिणीती म्हणून त्यांनी हे वृत्तपत्र काढले. मूकनायकाच्या पहिल्या अंकात वृत्तपत्राची भूमिका विस्ताराने समजावून सांगताना बाबासाहेब लिहतात.” आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास,तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वृत्तपत्रासारखी अन्य भूमीच नाही.परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हीतसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रमाद निघतात…… दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेत्तर या सज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो ; त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही. हेही उघड आहे.त्यांच्या अती बिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची चर्चा करण्यास स्वतंत्र वृत्तपत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. ”
बाबासाहेबांनी मूकनायकाची स्थापना गहन विचारांतून अन् ध्येयनिष्ठेतून केली आहे. त्यांची ध्येयनिष्ठा ही समाजाशी व समाज बांधिलकीशी संलग्न होती. बाबासाहेबांच्या सामाजिक ध्येयनिष्ठेचा साक्षात्कार मूकनायक वृत्तपत्रावरील त्यांनी उद्धृत केलेल्या बिरुदावलीवरून आपणास होतो.
” काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मूकियांचा जान ।
सार्थक लाजून नव्हे हित ।। ”
आंबेडकरांनी आपली ध्येयनिष्ठा व वृत्तपत्राची भूमिका स्पष्ट करण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा आधार घेतला आहे .या ओळी निवडण्यात मोठे औचित्य आहे. संत तुकारामांच्या या अत्यंत अर्थपूर्ण ओळी उद्धृत करीत बाबासाहेब मूक्याजनांचे अंतर्मनच वाचकांसमोर उलगडून दाखवतात. बाबासाहेबांचा मूकनायक हा सर्वार्थाने समाजप्रबोधनास सिद्ध झालाय असे आपणास जाणवते. बाबासाहेबांनी मूक नायकाच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याबरोबरच तत्कालीन सनातन व धर्माभिमानी लोकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित केलेल्या अंकात बाबासाहेब ‘ टिळकांचा सन्मान ‘ या लेखात लिहतात.” मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीला विरोध करण्याच्या कामी व त्यांना कायमचे अज्ञानांधकारात अवनतिगर्तेत ठेवण्याच्या कामी टिळकांनी गेली कित्येक वर्षे आपले पुण्य खर्ची घातले आहे.जातवार निवडणुकीचा प्रश्न पुढे आला नव्हता तोपर्यंत जातीभेदाचे समर्थन व गीतारहस्य समजून सांगण्याच्या मिषाने उपदेश करून त्यांनी या वर्गाचे अकल्याण करण्याची खबरदारी घेतली व हेच वर्ग स्वतंत्र प्रतिनिधी मागू लागताच कांगावा करायला सुरुवात केली व त्या योगाने जातिजातींतील वैमनस्य माजून जातीभेद नष्ट होणे लांबणीवर पडेल. या सबबीवर त्यांनी त्यांचे नुकसान करण्यास कंबर कसली. ” प्रस्तुत लेखात आंबेडकरांनी टिळकांचा जातीयवादी दृष्टिकोन वाचकांसमोर मांडला आहे. मूकनायक वृत्तपत्रात या लेखाशिवाय सोमवंशीय निराश्रित फंड, स्वराज्याची सर सुराज्याला नाही , स्वराज्याचे माता पिता,मुसलमान ब्राम्हण झाले व हे स्वराज्य नव्हे , हे तर आमच्यावर राज्य ! इ. लेख व अग्रलेखांतून तत्कालीन जातीयवादी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मूकनायक हे वृत्तपत्र फार कमी काळ चालले, थोड्याच कालावधीनंतर ते बंद पडले. या वृत्तपत्रात 19 अग्रलेख व काही लेख छापून आले होते. या लेखांचा अभ्यास केल्यास आपणास जाणवते की, मूकनायकाने हजारो वर्षांच्या ‘ मूक ‘ परंपरेला छेद दिला आहे

RELATED ARTICLES

Most Popular